यवतमाळ पोलिसांचा मोठा यशस्वी ऑपरेशन – नक्षल दलम कमांडरला अटक!

यवतमाळ :- यवतमाळ पोलिसांना मोठे यश मिळाले असून, छत्तीसगड राज्यातील एका नक्षल दलम कमांडरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तब्बल दीड महिन्याच्या शोधमोहीमीनंतर लकडगंज परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा नक्षल्यांसाठी रेस्ट झोन असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील टीप्पागड हा एक दुर्गम किल्ला असून, तो घनदाट जंगलाच्या परिसरात वसलेला आहे. हा किल्ला छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशाला लागून असल्याने येथे नक्षल चळवळ मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. येथे नव्याने भरती झालेल्या नक्षल्यांचे प्रशिक्षण दिले जाते आणि मोठमोठे कट रचले जातात.
याच भागात कार्यरत असलेल्या तुलसी उर्फ दिलीप महतो या नक्षल दलम कमांडरने आपल्या सहकाऱ्यांचा विश्वासघात करून चळवळीच्या तिजोरीवर डल्ला मारला. हा प्रकार उघड होताच, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा ‘गेम’ करण्याचा कट आखला. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेत त्याने तातडीने पळ काढला आणि छत्तीसगडऐवजी महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये लपून बसला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, एका चाणाक्ष अधिकाऱ्याने तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा मागोवा घेतला. तब्बल दीड महिन्याच्या शोधानंतर यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात, राणी सती मंदिराजवळ, त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.