आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पत्र..

अमरावती :- अमरावती शहरात निवासी प्रयोजनार्थ नझूल जमीन या भाडेपट्यांवर देण्यात आल्या आहेत. अशा अनेक नझूल जागा या ५० ते ६० वर्ष जुन्या असून मूळ मालकीहक्क शासनाकडे ठेवून त्या जागा नझूल जमीनधारकांना भोगवटदार वर्ग २ म्हणून भाडेपट्यांवर देण्यात आल्या होत्या. आता त्या संदर्भात नझूल जमीनधारकांना मूळ मालकीहक्क म्हणजेच त्यांना भोगवटदार क्र. १ मध्ये रूपांतरित करण्याला घेऊन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने सदरची कार्यवाही जलद गतीने करण्यास शिबिरांच्या माध्यमातून नझूल जमिनी प्री-होल्ड करून पी. आर. कार्डचे वाटप करण्यासंदर्भात शिबिरे राबविण्याबाबत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पत्र दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की; शहरातील खासगी जमीन, शासकीय जागा, नझूल जमीन तसेच भूखंडावरील बांधकामे नियमानुकुल करून मालमत्ताधारकांना पी. आर. कार्ड चे वाटपा संदर्भात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी नुकतीच शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा महसूल प्रशासन, तहसील व भूमी अभिलेख प्रशासनासोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये शहरातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्यावर दिलेल्या नझूल जमिनी फ्रि-होल्ड करण्यासंदर्भातील मुद्दा चर्चिला गेला असता, या संदर्भात शासनाचे अनुकूल धोरण असल्याची माहिती पुढे आली. व जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संपूर्ण प्रकिया राबविण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली होती. त्याअनुषंगाने नझूल जमीन फ्रि-होल्ड (भोगवटदार वर्ग-१) करण्यात यावी, तसेच पि-आर कार्डबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात यावी. या संदर्भातील तांत्रिक अडचणी असल्याने उपविभागीय अधिकारी अमरावती, तहसिलदार अमरावती, उपअधिक्षक- भूमिअभिलेख अमरावती यांच्या मार्फत तत्काळ निराकरण करून शिबिरांच्या माध्यमातून नझूल जमिनधारकांना मालकी हक्क प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून देखील चर्चा करण्यात आली असता त्यांनी शहरातील नझूल जमिनी फ्रि-होल्ड करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन शिबिरांच्या माध्यमातून पि-आर कार्डचे वाटप करणार असल्याचे आमदार महोदयांना सांगितले