LIVE STREAM

AmravatiDharmikLatest News

श्री संत गजानन महाराजांची भक्ती मनुष्याचे जीवन तारणारी आहे – आमदार सौ.सुलभाताई खोडके

अमरावती :- सुखदुःखाचे चक्र या भूतलावर सारखे फिरत असते.सुखानं माणूस मोहरतो; तर दुःखानं होरपळून जातो.अशावेळी दुःखानं गांजलेल्या माणसाला देवाचा ध्यास लागतो.’क्षण एक पुरे भक्तीचा, दिलासा देतसे शक्तीचा ‘ हा अनुभव मनुष्याला त्याच्या जीवनात येतो व तो भाविक बनतो.देवाचे नामस्मरण करतो.हे नामस्मरण मनुष्याला त्याचे जीवन तारण्यास उपयुक्त ठरते.भक्तगण शेगांवी जाऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतात.दर्शनाची ही रिघ रात्रंदिन अव्याहतपणे सुरूच असते.श्री संत गजानन महाराजांची भक्ती मनुष्याचे जीवन तारणारी आहे.असे प्रतिपादन आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले.गुरुवारी श्रींचा १४७ व्या प्रगटदिनोत्सव सोहळ्यात त्या बोलत होत्या.सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा ज्यांच्या अंतःकरणात ठाण देऊन राहिली आहे, मनाची समता कायम ठेवून प्राप्त परिस्थितीत जे अखंड आनंदामध्ये निमग्न आहेत,ज्यांची अंतःकरणे ईश्वरप्रेमाने भरून गेली आहेत, व त्याचे नामस्मरण व चिंतन करण्यात ज्यांचा अखंड काल व्यतीत होत आहे,ईश्वरी तत्वात जे समरस झाले आहेत, त्या प्रेरणेनेच जे सर्व भूतमात्रांचे कल्याण चिंतन करीत आहेत व आपली मानवी आयुष्ये त्यांच्या उन्नतीकरिता घालवीत आहेत व आपला देह परोपकारात झिजवीत आहेत,त्यांनाच संत म्हणून संबोधल्या व ओळखल्या जाते.

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या खेडेगावांत संत श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा,भावभक्तीची यमुना व ज्ञानरुपी सरस्वती सतत वाहत आहेत.ऐन तारुण्यावस्थेत असलेल्या ‘ श्रीं ‘ च्या परब्रम्हस्वरूप दिगंबरावस्थेतील पहिले प्रगटीकरण शेगांववासीयांना घडले तो दिवस होता २३ फेब्रुवारी १८७८.त्यानंतर सन १९१० मध्ये संजीवन समाधी घेईपर्यंत श्रींच्या अवतारकार्याचा प्रत्यक्ष अनुभव शेगांववासीयांनी दररोज घेतला.संत श्री गजानन महाराजांनी आपल्या अदभुत सामर्थ्याद्वारे अनेक चमत्कार घडविले.त्यातून लाखो भाविकभक्तांना श्रद्धेच्या माध्यमातून त्यांनी धर्माचरणाचा मार्ग दाखविला.आजही त्यांचे चमत्कार घडत आहेत. आजही लाखो भाविक या साक्षात्काराची प्रचिती घेत शेगांव येथे श्रींच्या दर्शनासाठी येत आहे.अशातच गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावती येथे श्रींचा १४७ वा प्रगटदिनोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती शहरातील रहाटगाव-दिप प्रतिष्ठान वसाहत-न्यू आयटीआय रोड-सात बंगला परिसर-प्रकाश विहार-महालक्ष्मी नगर-रिंग रोड-कैलास नगर-सूतगिरणी रोड-विवेकानंद कॉलोनी-न्यू आयटीआय कॉलोनी कॅम्प-व्यंकटेश कॉलोनी-चांदुर रेल्वे रोड-सुसंयोग कॉलोनी-कठोरा रोड-पटवारी कॉलोनी-श्रीहरी नगर-अर्जुन नगर-संकटमोचनं हनुमान ट्रस्ट,गाडगे नगर-राठी नगर-विलास नगर-त्रिमूर्ती भक्तीधाम मंदिर,निशिगंधा कॉलोनी-जवाहर नगर-अहिल्या मंगल कार्यालय,विवेकानंद कॉलोनी-रुख्मिणी नगर-स्वामी विवेकानंद थीम पार्क, कठोरा रोड,अमरावती आदींसहित विविध ठिकाणच्या संत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन व कृपाशीर्वाद घेतले.यादरम्यान त्यांनी ब्रह्मांडनायक-संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेस वंदन-पूजन-माल्यार्पण करीत श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन यादरम्यान विश्व मांगल्याची प्रार्थना केली.मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रगटदिनोत्सव सोहळा साजरा होत असताना भाविकभक्तांच्या वतीने सर्वत्र गण गण गणात बोते…… जय गजानन श्री गजानन….. अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सचिद्दानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय असा गगनभेदी सामूहिक नामघोष केला जात असल्याचे दृष्य यावेळी दिसून आले. तसेच टाळमृदंगाच्या गजरात दंग होऊन विविध भजन गात भावीकभक्त याप्रसंगी श्रींच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते.अमरावती शहरात श्रींच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यासोबतच मंदिर परिसरात सर्वत्र केळींचे खांब लावण्यासह आंब्याचे तोरण लावण्यात आले होते.यासोबतच श्री गुरूंचे सामूहिक नामस्मरण,आराधना,उपासना,मंत्राचा जागर,हरिभक्त परायण संतकवि श्रीदासगणू महाराज कृत श्री गजानन विजय तसेच श्री गजानन महाराज भक्तीविजय चे सामूहिक पारायण,महाआरती, महाप्रसाद आदींसह विविध प्रकारचे धार्मिक-अध्यात्मिक आयोजनामुळे स्थानिक परिसरात आत्मिक समाधान लाभणारे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्यासमवेत याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके, यश खोडके आदींसह भाविक भक्त,स्थानिक परिसरातील सेवेकरी, विश्वस्त, भाविकभक्तांसह ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधव तसेच युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!