मॅट्रिमोनियल वेबसाईटवर महिलांची फसवणूक: नकली दागिन्यांचं आमिष आणि धक्कादायक खुलासा

पालघर :- वसई पूर्व येथील वालीव पोलिसांनी बुधवारी एका २६ वर्षीय युवकाला अटक केली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील हिमांशू योगेशभाई पंचाल याने गेल्या अडीच वर्षांत मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन १५ हून अधिक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आणि त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंचाल याने मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून स्वतःला दिल्ली क्राईम ब्रँचच्या सायबर सुरक्षा विभागाचा अधिकारी असल्याचे दाखवले. तसेच, तो श्रीमंत घराण्यातील असून अनेक मालमत्ता त्याच्या नावावर असल्याचा बनाव केला.
तो महिलांशी संपर्क साधून त्यांच्यावर विश्वास बसवायचा आणि नंतर वसई, मुंबई आणि अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये बोलवायचा. तिथे त्यांना लग्नाचे आश्वासन देत नकली हिरे जडित दागिने भेट द्यायचा आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. त्यानंतर, काही ना काही कारण सांगून महिलांकडून पैसे उकळायचा आणि त्यांच्याशी संपर्क तोडायचा.
पंचालच्या फसवणुकीचा पर्दाफाश ६ फेब्रुवारी रोजी मीरा रोड येथील ३१ वर्षीय महिलेने वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा झाला. या महिलेच्या मते, पंचालने मॅट्रिमोनियल साइटवर तिच्याशी संपर्क साधला आणि विश्वास संपादन करण्यासाठी तिला एक हिऱ्याचे नेकलेस भेट दिले, जो नंतर बनावट असल्याचे समजले. तिने वसई आणि अहमदाबादमधील दोन हॉटेल्सची माहिती पोलिसांना दिली, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.