मुंबईत अग्नितांडव! इलेक्ट्रिक बाईकमुळे १२ वाहनं भस्मसात, परिसरात अक्षरश: कोळसा, रहिवाशांमध्ये संतापाची लाट

ठाणे :- अंबरनाथच्या पालेगाव परिसरात लँडस्केप हेरिटेज नावाचं गृहसंकुल आहे. या संकुलाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला काल बुधवारी रात्री आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आगीने इलेक्ट्रिक गाडीत स्फोट होताच रौद्ररूप धारण केलं आणि आसपासच्या गाड्यांनाही आगीच्या वेढ्यात ओढलं.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ११ दुचाकी आणि एका कारचा अक्षरशः कोळसा झालाय. त्यामुळे रहिवाशांमध्ये उद्विग्नता आणि संतापाचं वातावरण आहे. आता इलेक्ट्रिक गाडीच्या बाजूला कुणीही आपल्या गाड्या उभ्या करू नका, असं आवाहन सोसायटीतील रहिवाशांनी आसपासच्या इमारतीतील लोकांना केलंय. या घटनेमुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दरम्यान, काल कांदिवलीच्या दामू नगर झोपडपट्टीला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. मुंबईत आगीचं सत्र काही थांबता थांबत नाहीय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी या इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली असताना वरच्या मजल्यावर काम करणाऱ्या कामगारांना याची जाणीवच नव्हती.
मात्र, समोरच असलेल्या इमारतीमधील नागरिकांमुळे या कामगारांचे प्राण वाचले. नियमांची पायमल्ली करत बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप रहेजा विविएरा या इमारतीमधील रहिवाशांनी केला आहे.