वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव

वर्धा :- वरदा – वर्धा हे जिल्ह्याचे नाव साऱ्या दिगंतात प्रसिद्ध आहे. ते महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वास्तव्यामुळे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचा इतिहास केवळ दीड-पावणेदोनशे वर्षाचा असला तरी जिल्ह्याच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र, या आधीच्या शतकात शोधता येतात, त्या प्राचीन- मध्ययुगीन कालखंडात गुणाढ्यसारख्या पैशाची भाषेच्या विद्वान, जगविख्यात ‘ब्रहत्कथां’ च्या जनकाच्या रूपात, त्याच्या हिंगणघाट तालुक्यात पोथरा या गावातील वास्तव्यामुळे ! वैश्विक दृष्ट्या लोकभाषा व लोककथांचा मुळारंभ म्हणून गुणाढ्यांनी लिहिलेल्या या बृहत्कथांकडे पाहिले जाते. गुणाढ्याची मूळ लेखनसंहिता आज उपलब्ध नाही.
गुणाढ्याच्या लोककथांचा आधार घेऊन क्षेमेंद्र यांनी ‘बृहत्कथा’ व सोमदेव यांनी ‘कथासरितासागर’ या दोन संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली. ज्येष्ठ संशोधक व विदर्भातील लोकसाहित्याचे प्रख्यात अभ्यासक डॉ. भाऊ मांडवकर यांनी गुणाढ्य हे हिंगणघाट तालुक्यातील पोथरा गावातील मूळ रहिवासी असल्याचा दावा आपल्या ‘आदिजन’ या ग्रंथामध्ये केला आहे. ए. बेरेडल कीथ नावाच्या पाश्चिमात्त्य संशोधकाने कम्बोडिया येथे प्राप्त झालेल्या एका अभिलेखाच्या आधारे गुणाढ्याचा कालखंड शोधण्याचा प्रयत्न केला.
जागतिक साहित्यक्षेत्रात गुणाढ्याच्या कलाकृतीबाबत रोज नवी चर्चा होत असताना डॉ. भाऊ मांडवकरांच्या या संशोधनाकडे वैदर्भीय नव्या लोकसाहित्य अभ्यासकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते, वाशीम (वत्सगुल्म )आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोथराशी थेट संबध असणारा गुणाढ्य त्यातच अलीकडील काळात तो काश्मिरी होता, या तर्कावर अभ्यासकांमध्ये चर्वितचर्वण केल्या जात आहे. हा युक्तिवाद वैदर्भीय सांस्कृतिक विश्वाला धोक्याचा ठरू शकतो. देवळीचे मिरणनाथ महाराजांचे रामजी हरी फुटाणे उर्फ हरीसुत यांनी दीड शतकापूर्वी लिहिलेले गीतेवरील अभंग वृत्तात अतिशय सुमधुर भाष्य संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश मालधुरे यांनी अलीकडील काळात प्रकाशात आणले आहे. संत साहित्यात भर टाकणारे आहे.
महत्त्वाचा गुणाढ्याचा हा संदर्भ सोडल्यास वर्ध्याच्या वाडमयीन परंपरेची मुळे खऱ्या अर्थाने रुजली ती आधुनिक काळातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात ती म्हणजे गांधीजींच्या आगमनानंतरच! म्हणूनच असे म्हटल्या जाते वर्धा जिल्ह्याला फारशी साहित्य परंपरा नाही. नभांगणात अधूनमधून एखादा दुसरा तारा चमकावा, असं कधी कधी घडत असतं. एकतर गांधी, विनोबांच्या राजकीय परंपरेने या जिल्ह्याचे अवघे विश्व झाकोळल्या गेलेले आहे. अजूनही हा जिल्हा या छायेतून बाहेर पडलेला नाही. परंतु याच गांधी, विनोबांच्या वास्तव्याने काही विद्वान, संस्कृती, साहित्य व कलापुरुषांचा वर्ध्याला स्पर्श झाला, हेही तेवढेच खरे!.
स्वतः विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ – १५ नोव्हेंबर १९८२) संत, प्राच्यविद्या पारंगत व थोर साहित्यिक होते. ‘गीताई’, ‘मधुकर’सारखी अजरामर रचना, ‘गीता प्रवचने’ सारखे अजोड साहित्य त्यांनी निर्मिले.
ज्यात अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई-चिंतनिका, गुरूबोध सार (सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, लोकनीती, विचार पोथी साम्यसूत्र, साम्यसूत्र वृत्ति, स्थितप्रज्ञ-दर्शन ही विनोबाची विपुल ग्रंथ संपदा आहे. विनोबांचा वारसा दादा धर्माधिकारी यांनी ( जन्म इ.स. १८८९ तर मृत्यू १ डिसेंबर, १९८५) त्यांच्या आपल्या गणराज्याची घडण (मराठी), गांधीजी की दृष्टी, तरुणाई, दादांच्या बोधकथा, बाग १ ते ३, दादांच्या शब्दांत दादा, भाग १, २., नागरिक विश्वविद्यालय – एक परिकल्पना, प्रिय मुली, मानवनिष्ठ भारतीयता, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, लोकशाही विकास आणि भविष्य, सर्वोदय दर्शन, स्त्री-पुरुष सहजीवन, हे ग्रंथ तर त्यांचे सुपुत्र न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (जन्मतारीख: २० नोव्हेंबर, १९२७ मृत्यू: ३ जानेवारी, २०१९) यांनीही अंतर्यात्रा, काळाची पाऊले, न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी), भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझिल दूरच राहिली!, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी), शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहूया आदी ग्रंथातून विपुल लेखन केले आहे .
पु. य. देशपांडे (जन्म ११ डिसेंबर १८९९ मृत्यु २६ जुलै १९८६ ) यांच्या बंधनाच्या पलिकडे, सदाफुली, अनामिकाची चिंतनिका -1962 साहित्य अकादमी पुरस्कार भेविघोष- धर्मघोष, काळी राणी, मयूरपंख, विशाल जीवन कादंबऱ्या व गांधीजीच का? हे वैचारिक लेखन, आचार्य काका कालेलकर यांची गुजराथी – हिंदी- मराठीतील वैविध्यपूर्ण साहित्य संपदा, भदंत आनंद कौसल्यायन, भवानीप्रसाद मिश्र, शंकरराव देव, आचार्य जावडेकर, श्रीकृष्णदास जाजू, श्रीमन्नारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, डॉ. म. गो.बोकरे, मदालसा नारायण, प्रा. निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदासजी बंग, सुमनताई बंग यांची वैचारिक लेखनाची परंपरा डॉ. अभय बंग पुढे नेतांना दिसतात गांधीवादी साहित्य परंपरा इथेच थांबत नाही, तर पुढच्या काळात बौद्ध पंडित प्रो. धर्मानंद कोसंबी या प्रभावळीत येऊन सामील होतात. वामनराव चोरघडे यांच्या संस्कारक्षम कथांच्या पहिला संग्रहाचा बहर येथेच बहरतो आणि पुढे मराठी लघुकथेच्या मांदियाळीत दाखल होतांना दिसतो, त्यांची खरी ‘जडण घडण’ (आत्मचरित्र, १९८१) वर्ध्यातच झालेली आहे. तर आजही ‘खादीशी जुळले नाते’ या आत्मकथनातून रघुनाथ कुलकर्णी यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातून भारताच्या खादी क्षेत्रातील वाटचालीचं खरखुरं चित्र रेखाटलं आहे .