LIVE STREAM

AmravatiLatest News

फिटस इन फिटो ” शस्त्रक्रियेतील बाळाची प्रकृती सुधारल्या नंतर निरोगी स्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज..

अमरावती :- आपल्या जिल्ह्यात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी अतिशय क्लिष्ट आणि दुर्मिळ असलेल्या “फिटस इन फिटो” या वैद्यकीय स्थितीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही केस अत्यंत दुर्मिळ असून, विभागातील डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सातत्याने मेहनत घेत रुग्णाच्या संपूर्ण आरोग्य सुधारासाठी आवश्यक ती काळजी घेतली. सर्व उपचार यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर बाळाला निरोगी स्थितीत घरी पाठविण्याचा हा एक भावनिक आनंदाचा क्षण असून ही वैद्यकीय उपलब्धी केवळ विभागीय स्तरावरच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. असे भावोद्गार अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे, नवजात ३ दिवसीय मुलाच्या पोटातील दोन मृत अर्भक शस्त्रक्रियेद्वारे काढून त्या मुलाचे प्राण वाचविले. जवळपास २० दिवस बाळावर उपचार केल्यांनतर त्याला निरोगी स्थितीत आज २१ फेब्रुवारी रोजी सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. या संदर्भात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे छोटेखानी कार्यक्रम व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त तथा विभागीय संदर्भीय सेवा रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष- श्वेता सिंघल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, पेटियाट्रिक्स सर्जन डॉ. नवीन चौधरी, डॉ. उषा गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, कोरोना काळापासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील आरोग्य सेवांचा विस्तार झाल्याने रुग्णांना आरोग्य संजीवनी मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित स्पेशालिस्ट डॉक्टर येथे सेवाभावीपणे रुग्णांवर उपचार करीत असून अनेक गरीब व गरजू रुग्णांवर शासनाच्या आरोग्य योजनांमधून गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करण्यात आल्या आहेत. अमरावतीमध्ये ज्या आरोग्याच्या सुख-सोयींपूर्ण सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वाढता रुग्णसेवेचा डोलारा लक्षात घेता आगामी काळात फेज-३ बाबत नियोजन सुरु आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या विविध सेवांबद्दल प्रशंसा केली. ज्या रुग्णालयांनी बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी असमर्थता दर्शविली त्यानंतर अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने तीन दिवसाच्या बाळाला ऍडमिट करून घेऊन सर्व तपासणी नंतर फिटस इन फिटो ची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. हा वैद्यकीय आविष्कार रुग्णालयाच्या विश्वसनीयता व सेवाव्रती जबाबदारीचे फलित असल्याचे मनोगत विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी व्यक्त केले.

यावेळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक – डॉ. अमोल नरोटे यांनी सांगितले की, बुलढाणा येथील महिलेच्या गर्भामधील गर्भाच्या पोटात सुद्धा गर्भ होता. बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी सर यांनी सदर रुग्णास संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्याचा विचार केला. तथापि, त्या रुग्णालयाने या शस्त्रक्रियेस असमर्थता दर्शवली. त्यानंतर, डॉ. भुसारी सर यांनी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्याशी संपर्क साधला, त्यानुसार, रुग्णास सुरक्षितपणे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे हलविण्यात आले. त्या बाळाला रुग्णालयातील एन. आय. सी .यु. मध्ये ठेवण्यात आले. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याची सोनोग्राफी व सिटीस्कॅन तपासण्या केल्यानंतर असे आढळले की त्या मुलाच्या पोटामध्ये दोन मृत अर्भक आहे. तसेच सर्व प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील तज्ञ डॉक्टरांची टीम यांनी गेल्या ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तीन दिवसीय मुलाची शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील दोन मृत अर्भक काढून त्या बाळाचे प्राण वाचवले. अशा प्रकारच्या केसेस फार क्वचित असतात. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी सांगितले की, कोरोना काळापासूनच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या आरोग्य सेवांचा विस्तार व तेथे सर्व वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याला घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे. राज्यात नाशिक व अमरावती याठिकाणीच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असून शासनाकडून दोन्हीसाठी एकत्रित निधी मिळतो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावतीला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर , इक्वीपमेंट व मनुष्यबळ पुरविणे आवश्यक आहे. तसेच शहरातील खासगी नामांकित डॉक्टर्स सुद्धा येथे येऊन सेवा देत आहे. त्यांच्या मानधनाचा देखील प्रश्न आहे. यासाठी रुग्णकल्याण नियामक समितीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना संजय खोडके यांनी केले. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मिळणाऱ्या पैशातून हॉस्पिटल ने अनेक चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. अमरावती मध्ये “फिटस इन फिटो” शस्त्रक्रिया पार पाडणाऱ्या टीमचा राज्यस्तरावर गौरव व्हावा असे सांगून राकॉ नेता संजय खोडके यांनी सर्व वैद्यकीय टीम चे अभिनंदन केले. यावेळी फिटस इन फिटो ची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शिशुच्या आई -वडिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी सुद्धा रुग्णालयाच्या टीम च्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळ पेडियाट्रीक सर्जन – डॉ. नवीन चौधरी, डॉ. उषा गजभिये, बधिरीकरन तज्ञ – डॉ. संजय महतपुरे, बालरोग तज्ञ – डॉ. नितीन बरडिया,डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ. निलेश पाचबुद्धे, आर.एम.ओ. डॉ. माधव ढोपरे, अधीसेविका – माला सुरपाम, इन्चार्ज सिस्टर – विद्या चुडे, पुष्पा घागरे, ज्योती गोंडसे, मनीषा राऊत, इलायजा तेलगोटे, रूपाली गवई, स्नेहा काळे, समाजसेवा अधीक्षक – शितल बोंडे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, औषध विभाग – योगेश वाडेकर, सुधीर मोहोळ, आशिष आत्राम, सारिका कराळे, ज्ञानेश्वर डोंगरे, अर्चना डंबाले आदीसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील स्टाफ व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!